नायगाव तालुका प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव – जिल्हा परिषदे अंतर्गतच्या विविध विभागात कर्मचाऱ्यांची उपस्थिती व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी क्यूआर कोडद्वारे हजेरी देण्यासाठी अॅप विकसित केले. या अँपद्वारे नायगाव तालुक्यातील इतर कर्मचारी हजेरी देत नसले तरी ५५ ग्रामसेवकांनी मात्र क्यूआर कोडद्वारे हजेरी नोंदवित आहेत.
जिल्हा परिषदेचे ग्रामीण भागातील कर्मचारी कार्यालयात नियमित उपस्थित न राहता त्यांच्या सोईप्रमाणे हजर राहतात. त्यामुळे कामकाजावरही याचा परिणाम होत होता. उशिरा येण्याचे कारण विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे
देण्यात येत होती. या दांडीबहाद्दरावर कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी एक अँप विकसित केले आणि विकसित केलेल्या अँपच्या क्यूआर कोडवरुन हजेरी नोंदवणे बंधनकारक केले होते.
जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणारे अनेक विभागातील कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला पण नंतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांना विश्वासात घेऊन
क्यूआर कोडद्वारे हजेरी नोंदवण्यासाठी तयार केले. वास्तविक ग्रामीण भागात काम करणाऱ्या ग्रामसेवकांना नियमित हजेरी नोंदवण्यासाठी मस्टर नसतांनाही ग्रामसेवकांनी क्यूआर कोडद्वारे हजेरी नोंदवण्याची तयारी दाखवली. त्यामुळे नायगाव तालुक्यातील ५५ ग्रामसेवक आता नियमितपणे क्यूआर कोडद्वारे हजेरी नोंदवत असल्याची माहिती ग्रामसेवक संघटनेचे प्रभारी अध्यक्ष सूर्यकांत बोंडले यांनी दिली आहे.