संभाजीनगर – विधानसभा निवडणुकीतून प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीस उभे करायचे याचा निर्णय तेव्हा घेतला जाईल, असे माजी खासदार जलील यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद शहरातील तीन मतदारसंघापैकी दोन मतदारसंघात आघाडी मिळविण्यात इम्तियाज जलील यांना यश मिळाले होते.
त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात ‘एमआयएम’ चे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील. मात्र, कोणत्या मतदारसंघातून कोण उमेदवार याचे तपशील जाहीर होऊ नयेत, असा संभ्रम कायम ठेवण्यात आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ’एमआयएम’ ला त्यांचा प्रभाव कायम ठेवता आला नव्हता. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून डॉ. गफ्फार कादरी पराभूत झाले होते. अतुल सावे यांना यश मिळाले. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रदीप जैस्वाल यांना यश मिळाले होते. त्यामुळे एमआयएमच्या विधानसभेतील प्रभाव कमी झाला होता. आता लोकसभेत पराभूत झाल्यानंतर इम्तियाज जलील हे पुन्हा विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. या पूर्वी ते औरंगाबाद मध्य मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. भाजप व शिवसेनेतील मतांच्या विभागणीचा त्यांना लाभ झाला होता.