महायुतीने २८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात तर महाविकास आघाडीने २८१ जणांना उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी (२९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडी व महायुतीकडून मंगळवारी दुपारपर्यंत आपले उमेदवार जाहीर करणं चालूच होतं. अखेरपर्यंत महायुतीने व महाविकास आघाडीने त्यांचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला नाही. दरम्यान, महायुतीने २८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. तर महाविकास आघाडीने २८१ जणांना उमेदवारी दिली आहे. यासह मनसे, वंचित बहुज आघाडी, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीसह इतर अनेक पक्षांनी राज्यात त्यांचे उमेदवार उभे केले आहेत.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण ७,९९५ जणांनी १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक अधिकारी आज (३० ऑक्टोबर) या अर्जांची पडताळणी करतील. तर, निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.