नांदेड व हिंगोली जिल्ह्यात तत्काळ पंचनामे सुरू करा- धनंजय मुंडे

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

शेतकऱ्यांनी स्वत:ला एकटे समजू नये. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

मुंबई : मराठवाड्यात नांदेड व हिंगोली या दोन जिल्ह्यांतील काही भागांत अतिवृष्टी असून उर्वरित संपूर्ण मराठवड्यामध्ये पावसाचा मोठा खंड असल्यामुळे खरीप पिके अडचणीत आली आहेत.

त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला अंतरिम दिलासा मिळवून देण्यासाठी सर्व मंडळांमध्ये तत्काळ पंचनामे सुरू करावेत, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रशासनास दिले.

पंचनामे करण्यासाठी कृषी, महसूल खात्यांबरोबरच पीक विमा कंपनी यांचे सहकार्य घ्यावे, असेही त्यांनी सांगितले. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे आणि या काळात शेतकऱ्यांना दिलासा देणे, पिण्याच्या पाण्याचे, जनावरांच्या चाऱ्याचे आदी नियोजन करणे या विषयांवर बैठकीत चर्चा झाली.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले,”मराठवाड्यातील बहुतांश भागाला दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सहा जिल्ह्यांत तर भयावह स्थिती आहे. २०१४ मध्ये जशी दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती, तशीच विद्यमान परिस्थिती आहे.

तथापि, शेतकऱ्यांनी स्वत:ला एकटे समजू नये. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.” दुष्काळाची संभाव्य दाहकता पाहता मंडळनिहाय पंचनामे करून तालुकानिहाय आपत्कालीन आराखडा तयार करून शासनाला सादर करावा,

असे संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. पावसाचा खंड दाखवण्यामध्ये देखील अनेक त्रुटी दिसून येत असून याबाबत धनंजय मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!