सरकार आज आपल्या लग्नाचा वाढदिवस
“सरकार “आज बरोबर 34 वर्षे झाली आपल्या लग्नाला.
आणि खात्री आहे की,पूढील आयुष्यही असंच जाईल.या 34 वर्षाच्या काळात तुम्ही जो मला सपोर्ट केलाय ना त्यासाठी मनापासून आभार! तुमच्या सुरक्षित छायेत राहून व तुमच्या पंखाच्या साह्याने मला आकाशात झेप घेण्याचं बळ तुम्ही मला दिल हे खरंच प्रत्येकाच्या नशिबी नसतं हो!बळ देताना तेथे वैचारिक मांडणी कशी करावी. संसार चालवताना काटकसर कशी करावी हे मात्रं नक्कीच तुम्ही मला शिकवले त्या बद्दल तुम्हास कौतुकाची थाप देतो.कारण हे नाही जमत हो सगळ्या बायकांना. हा तुमच्या विचारांचा प्रभाव आणि वारसा माझ्या पाठीशी आहे म्हणून माझ्यात आयुष्य जगण्याची उर्मी निर्माण करते. आणि जगात ताट मानेने जगण्याची गुर्मी निर्माण करते.आणि ही गुर्मी माझ्यात कायम राहावी म्हणून मला तुमची कायम साथ लागेल हे मात्रं तुम्ही विसरू नका बरं!
23 मे 1991 रोजी आपले लग्न झाले. आणि आपण आपल्या स्वप्नाला सुरुवात केली.हसत खेळत संसार चालवताना व अनेक अडचणीचा सामना करत असताना आपण दोघे अनेक वेळा एकमेकांवर चिडलो, रागावलो, कधी रुसलो, कधी भांबावलो, कधी भांडलो, पण कधी एकमेकांपासून एक क्षण ही दूर राहू शकलो नाही.आणि कधी आबोलाही धरून राहू शकलो नाही हे आपल्या खऱ्या प्रेमाचा प्रतिक!
संसाराचा गाडा चालताना मी अनेक वेळा दु:खी झालो पण तुझ्या खंबीर पाठिंब्यामुळे कधी डगमगलो नाही. माझी पत्नी म्हणून नातं निभवत असताना तुला माझ्या सोबत अनेक नाते निभवावी लागली. संकटकाळी कधी तू दुर्गा बनून माझ्या पाठीशी उभी राहिली. दुःखाच्या प्रसंगी बहिणीसारखी सोबत राहिली. वाकड्या वळणावर आईसारखे पदरात घेतलं तर चुकल्यावर वडिलांसारखा धाक दाखवण्याचा प्रयत्न पण केलास.कधी सुकलो भागलो तर पोटच्या मुला मुली सारखं प्रेम केले.आणि माझी पत्नी म्हणून तू कुटुंबासाठी जे जे करता आलं ते ते तूझ्यापरीन तू करायचा प्रयत्न केला.अर्थात मीही कुठे चुकलो असेल पण मला तु निर्मळ मनाने माफ केलस. पत्रकारिता सारख्या क्षेत्रात मी काम करत असताना मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला पण मला माझ्यासोबत ढाल बनून मला साथ दिली व पत्रकारिता क्षेत्रात संधीच सोनं करण्याची संधी दिली.जे काही आपल्याजवळ आहे सुख- समाधान,धन,दौलत,प्रपंच, मुलं,बाळ ही सर्व किमया तुझ्या धैर्याची आणि शौर्याची आहे.मी फक्त काडी मात्र तुझ्या सोबत आहे इतकंच.!
माझा स्वभाव प्रत्येक गोष्टीत काहीतरी शिकायला मिळतं आणि ते शिकल पाहिजे. या मताचा मी.
खरं सांगू “सरकार “मी या विवाह बंधनातून अर्थात पती-पत्नीच्या नात्यातून हे शिकलो. खरंच प्रत्येक पुरुष आणि स्त्रीला विवाह बंधन आवश्यकच आहे. तरच त्या पुरुष आणि स्त्रीला त्यांच कर्तत्व,मातृत्व,नेतृत्व,दातृत्व आणि दायित्व हे सिद्ध करायची संधी इतर कुठेही मिळत नाही.
मला सार्थ अभिमान आहे सरकार तुमचा या सर्व संधी तुम्ही मला प्राप्त करून दिलात.तुम्ही दिलेला आत्मविश्वास प्रोत्साहन न थांबवता दिलेली साथ हे अविस्मरणीय आहे. खूप खूप मनापासून आभार आणि मनातून प्रेम.प्रिय *सरकार* सौ. गीता शंकरसिंह ठाकूर आपणास लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!❤️