मुंबई : भाजपविरोधात विरोधकांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान मोदींना टक्कर देण्यासाठी विरोधकांनी ‘इंडिया’ आघाडी तयार केली आहे. उद्या मुंबईत इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षातील सर्व नेते उपस्थित राहणार आहे.
या बैठकीत इंडिया’कडून पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, यावरून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.
इंडिया आघाडीच्या संयोजकासाठी आम्ही किमान समान कार्यक्रम करू शकतो. या आधारे संयोजन बनवू, असं शरद पवार म्हणाले. तर, पंतप्रधानांसाठी आमच्याकडे खूप पर्याय आहेत. पण भाजपाकडे काय पर्याय आहे? गेल्या १० वर्षांत त्यांनी काय केलं? सगळ्यांनी त्यांचा अनुभव घेतला आहे. कर्नाटकात पाहिलं आपण, कोणतंच यश मिळालं नाही. बजरंग बलीनेही त्यांना आशीर्वाद दिला नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मी मुख्यमंत्री होतो, जयंत पाटील, आदित्य ठाकरे आणि इतर सगळे सहकारी हे सगळे माझ्या बरोबर मंत्रिमंडळात होते. नाना पटोले हे तर अध्यक्ष पदावर होते. त्यावेळी असा कोणताही प्रस्ताव आणण्याचं धाडस केंद्र सरकारने केलं नव्हतं. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणं किंवा केंद्रशासित करणं हा भाजपाचा डाव आता उघड झाला आहे. आम्ही सत्तेत असताना असा प्रस्ताव आणण्याची त्यांची हिंमत नव्हती. आत्ताही हा प्रस्ताव मंजूर होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.