मुंबई : मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी सहकाऱ्यांना सावध केलं असून अटकेची तयारी ठेवा, असं म्हटलं आहे.
काल २८ पक्षांचे नेते मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये दाखल झाले होते. आज सकाळी फोटोसेशन आटोपल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली आहे.
इंडिया आघाडीतील नेत्यांची बैठक संपन्न झाल्यानंतर पत्रकार परिषद होईल. त्यापूर्वी बैठकीत नेते बोलत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी बैठकीतील उपस्थित नेत्यांना अटकेची तयारी ठेवा, असा सल्ला दिलाय. ‘एबीपी माझा’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
काय म्हणाले मल्लिकार्जून खर्गे?
बैठकीमध्ये बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, सध्या भाजप सूडबुद्धीने काम करत आहे. देशातल्या तपास यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर होत आहे. त्यामुळे आपल्याला अटकेची तयारी ठेवावी लागेल.
विरोधी पक्षातील नेत्यांना दाबण्यासाठी तपास यंत्रणांचा दुरुपयोग होऊ शकतो. तरीही आपण सरकारच्या कार्यपद्धतीवर हल्ला करणं आवश्यक आहे. आपल्या काही सहकाऱ्यांवर छापे पडण्याची शक्यता आहे, असंही खर्गे म्हणाले.
इंडिया आघाडीचं संयोजक पद काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे द्यावं यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे. आजच्या पत्रकार परिषदेत याबद्दल स्पष्टता येऊ शकते.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण पुढे ढकलण्यात आल्याची माहिती येत आहे. लोगोचं अनावरण दिल्लीत करण्याच्या सूचना काही नेत्यांकडून आल्या होत्या. यामुळे दिल्लीत पुढील आठवड्यात अनावरण होईल, अशी शक्यता आहे.