नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.2.जिल्यातील भोकर वासियांना डोके दुःखी ठरलेली वाहतुकीची कोंडी सोडवून आपल्या जीवितास निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी आज भोकर येथील प्रथितयश अशा ‘शाहू’ विद्यालयातील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांना स्वाक्षरीचे निवेदन दिले. वाढत्या वाहतुक समस्येला सोडवण्यासाठी चक्क विद्यार्थांनाच सामोरे यावे लागले. आज दिवसभर शहर व परिसरात याच गोष्टीची चर्चा सुरू होती. भोकर शहरातील बसस्टँड ते ‘शाहू विद्यालय’ (बोरगाव रोड), व शासकिय विश्रामगृह ते डाॅ.आंबेडकर चौक या हमरस्त्यावर पायी अथवा सायकलने येजा करण्यासाठी विद्यार्थांना जीवाची कसरत करावी लागत आहे.भर रस्त्यात टेंपो,आटो जड वाहने व जनावरे यांचा धुमाकुळ मोठ्या प्रमाणावर चाललेला आहे. त्यामुळे वाहनांची कोंडी होऊन विद्यार्थांना शाळेत येण्या-जाण्यासाठी रस्यावरुन चालने कठीन झाले आहे.
आजतागायत दर एकदोन दिवसाआड शहरातील मुख्य रस्त्यावर जीवघेणे अपघात घडले असुन चिमुकल्यांना तर आपला जीव मुठीत घेऊनच शाळा व शिकवणी वर्गासाठी ये-जा करावी लागते.विशेष म्हणजे एकट्या ‘शाहू विद्यालयाची’ विद्यार्थी संख्या सुमारे पाच हजार असून शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस अर्धा अर्धा तास रस्ता विद्यार्थांनी तुडुंब वाहत असतो. पण या समस्येकडे आजतागायत भोकर शहरातील सुज्ञ नागरीकांनी व जाणकार मंडळींनी जाणून बुजून दुर्लक्ष केले.यापुर्वी अनेक पत्रकार बंधुंनी या समस्येला विविध वृत्तपत्रातुन वाचा फोडली. तरीही समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने कुठलेही प्रयत्न केले नाहीत. यावेळी मात्र ‘शाहू’ विद्यालयाच्या सुमारे ५००० विद्यार्थांनी पुढाकार घेउन प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाहतुकीची समस्या सोडवण्याचे आवाहन केले आहे. आतातरी चिमुकल्यांच्या या प्रयत्नास यश मिळेल का व त्यांना मोकळा श्वास घेता येईल का हे पाहणे अगत्याचे ठरेल.